संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

संस्थानचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य

शिवभावे जीवसेवा‘ या स्वामी विवेकानंदांच्या बोधवचनाने प्रेरित होऊन संस्थानने रूग्णांची सेवा करण्याचे धोरण आखले आहे. या सेवाकार्या अंतर्गत रूग्णसेवा व त्यांना विनामुल्य औषधोपचार मिळवून देणे हा एक महत्वाचा उद्देश जनहितार्थ संस्थानने आपल्या डोळयासमोर ठेवला आहे. मंदिराच्या आवारात जी भव्य वास्तु आहे त्यावरील मजल्यावर होमिओपॅथी, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथी हे तीनही प्रकारचे औषधालय विभाग संस्थानने उघडलेले असून अपंग युनीट, फिजीओथेरपी, पॅथॉलॉजी विभाग आहे. तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांच्याव्दारे गरीब रूग्णांना तपासणे, औषध, इंजेक्शन व सलाईन देणे इत्यादी सेवा संस्थान करीत आहे.

 

धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखाना

हा विभाग संस्थानने इ.स.१९६३ पासून सुरू केला आहे. अतिप्राचिन भारतीय आयुर्वेदीक उपचार पध्दतीव्दारे रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी, आयुर्वेद या भारतीय उपचार पध्दतीचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे तसेच रुग्णांना या  उपचारपद्धतीव्दारे   पारंपारिक वनौषधींचा लाभ घेता यावा हा या मागील उद्देश आहे. मार्च २०१ पर्यंत २६,३४,१७२ रूग्णांनी औषधोपचाराचा लाभ घेतला आहे.  

 

धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना

हा विभाग संस्थानने इ.स.१९७३ पासून सुरू केला आहे. या विभागाव्दारे संस्थानने होमिओपॅथीक उपचार पध्दतीच्या माध्यमातून पुरविलेल्या वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना होत आहे. मार्च २०१ पर्यंत ४४,५१,३४३ रूग्णांनी औषधोपचाराचा लाभ घेतला आहे.

 

धर्मार्थ अ‍ॅलोपॅथी दवाखाना

हा विभाग संस्थानने इ.स.१९७४ पासून सुरू केला आहे. हा दवाखाना विविध उपचार सुविधांनी सुसज्ज आहे. बाहेरील शहरांतूनसुध्दा विशेष३९ तज्ञ डॉक्टर्स रूग्णांची खास तपासणी करण्याकरीता संस्थानला आपली सेवा विनामूल्य प्रदान करीत असतात. संस्थानच्या अ‍ॅलोपॅथी दवाखान्यातून औषधोपचारासाठी येणा-या रूग्णांच्या सेवेसाठी पॅथॉलॉजी विभाग सुरू करण्यात आला असून रूग्णांची रक्त, थुंकी, लघवी आदिंची तपासणी करण्यात येते, त्यासाठी विविध चाचण्या करण्यात येतात. मार्च २०१ पर्यंत संस्थानच्या अ‍ॅलोपॅथी दवाखान्यामधून ९०,४२,२८२ रूग्णांनी लाभ घेतला आहे. ही सर्व रूग्णसेवा संस्थान आत्यंतिक जिव्हाळयाने करीत आहे.

  

अपंग पुनर्वसन केंद्र

श्रीसंस्थानने अपंग पुनर्वसन केंद्र मंदिराच्या आवारात उघडले असून अपंगांना या पुनर्वसन केंद्राचा लाभ मिळत आहे. संस्थानच्या या सेवाकार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने स्मृती चिन्ह देऊन गौरव केला आहे. या सेवेअंतर्गत एका अपंग शिबीराचे संस्थानने आयोजन केले होते. संस्थानने आयोजित केलेल्या विकलांग शिबिरात २५८४ रूग्णांची तपासणी होवून ४०० अपंग रूग्णांवर उदयपूर येथे शस्त्रक्रियेकरीता निवड करण्यात आली व ४१८ विकलांगांना ट्रायसिकल, व्हिलचेअर, कुबडी व कॅलीपर्स देण्यात आले. हा सर्व खर्च संस्थानने केला आहे. संस्थानने या सेवेअंतर्गत अद्ययावत अपंग युनिट सुरू केले असून विविध आकारातील जयपूरफूट कृत्रिम अवयव तयार करून वितरित केले जातात. अपंग पुनर्वसन केंद्रात  मार्च २०१ पर्यंत ,४८,०४६ रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

 

नेत्र शस्त्रक्रिया शिबीर

इ.स. १९७५ पासून संस्थानव्दारा वेळोवेळी भव्य प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा सेवाप्रकल्प संस्थानने राबविला असून आतापर्यंत १३,६४२ रूग्णांना दृष्टीलाभ झालेला आहे. या शिबीरामध्ये आलेल्या रूग्णांची राहण्याची, जेवणाची, चहा व फराळाची व्यवस्था संस्थानव्दारा विनामूल्य करण्यात आली व रूग्णांना संस्थानव्दारा चष्मे देखील वितरीत करण्यात आली. संस्थानच्या या राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्याबद्दल सन १९८२-८३ व सन १९८३-८४ या वर्षासाठी संस्थानला शासनाने प्रशस्तिपत्र प्रदान करून, संस्थानचा गौरव करण्यात आलेला आहे.

 

फिरते रूग्णालय

सन १९८२ मध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संस्थानने फिरते अ‍ॅलोपॅथी रूग्णालय सुरू केले आहे. ग्रामीण विभागातील रूग्णांची वैद्यकिय सेवा व्हावी व ज्या गावांमध्ये सरकारी रूग्णालय नाही अशा कवठळ, तरोडा-डी, येउलखेड, टुनकी, वसाळी इत्यादी खेडयांमध्ये श्रीसंस्थानचे हे फिरते रूग्णालय कार्य करीत आहे. या सेवाकार्यासाठी संस्थानने आठ सेवक नेमले आहेत. तसेच आदिवासी विभागात आदिवासी बांधवांना औषधोपचार विनामुल्य मिळावेत या दृष्टीने संस्थानने सातपुडा प्रकल्प ही योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत आदिवासींच्या सेवेसाठी दोन फिरते रूग्णालय संस्थानने सुरू केले आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव व्दारा संचालीत ग्रामीण आरोग्य सेवा योजनायोजनेचा उद्देश:

ग्रामिण भागातील कोरडवाहू शेतजमीनधारक शेतकरी कुटुंब व दारिद्ररेषेखालील कार्डधारक, गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत/असमर्थ रूग्णांना सुदृढ आरोग्याच्या दृष्टीकोणातुन विविध आजाराच्या उपचारार्थ फक्त ऑपरेशनकरीता वैद्यकीय मदत म्हणून संस्थेकडुन यथाशक्ती आर्थीक सहाय्य करणे.

योजनेची सुरूवात:

पहिला सर्वे : प्रथम आरोग्यसेवेकरीता शेगांव व बुलडाणा हे दोन तालुके घेण्यात आले. यामध्ये शेगांव तालुंक्यातील ६३ गावांचा व बुलडाणा तालुक्यातील ७९ गावांचा सर्वे माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २००७ मध्ये करण्यात आला. दोन्ही तालुक्यामधील रूग्णांना सर्व आजार व ऑपरेशनकरीता मदत देण्यात येत होती परंतु संपूर्ण जिल्हाभरात ऑपरेशनकरिता ही योजना राबवण्यासाठी दुसरा सर्वे करण्यात आला.

दुसरा सर्वे : हा सर्वे तीन  टप्प्यांमध्ये करून बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांचा समावेश करण्यात आला. पहीला टप्पा दि.२७/०९/२००८ ते १५/१०/२००८ पर्यंत करून यामध्ये शेगांव, खामगांव, नांदुरा, संग्रामपुर, जळगांव (जामोद) व बुलडाणा हे तालुके घेण्यात आले. या सर्वेचे कार्यालय आनंदसागर विसावा येथे होते. दुसरा टप्पा दि. १५/११/२००८ ते ३/१२/२००८ पर्यंत करून यामध्ये चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देउळगांव राजा हे तालुके घेण्यात आले. हा सर्वे वेदांत आश्रम, सुलतानपुर ता. लोणार येथुन केला. तीसरा टप्पा दि. १४/०१/२००९पर्यंत क रून यामध्ये मोताळा, मलकापुर हे तालुके घेण्यात आले. हा सर्वे शेलापूर बु. ता. मलकापुर येथून केला.

लोकसंख्येबाबत :-

ही योजना कार्यान्वित करण्याकरिता प्रत्येक तालुक्यातील गावात घरोघरी जावून प्रत्येक कूटुंबाचा सर्वे केला. यामध्ये १३ तालुक्यामधून तीन हजार लोकसंख्येच्या आत असणारी गावे घेण्यात आली ती पूढील प्रमाणे.

एकूण तालुके -१३
एकूण गावे - ११३९
एकूण कुटुंब- २,४५,२३२
एकूण लोकसंख्या - १२,४७,४८७
या सेवेकरिता विविध सेवाधारी गट तयार करण्यात आले तसेच १९ वाहनांचा समावेश करण्यात आला.

रुग्णांनी अर्ज करण्यासंबंधी -

रुग्ण हा - १. पंधरा एकरा खालील कोरडवाहू शेतजमीन असलेल्या कुटुंबातील असावा.
२.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील व्यक्ती असावा.
३.दारीद्रयरेषेखालील कार्ड /दाखला असलेल्या गरजु कुटूंबातील असावा.
रुग्णासाठीचे नियम :- १)कार्यालयातून घरोघरी जावून ऑपरेशन फॉर्म देण्यात आलेले असून ऑपरेशनसंबधी पांढरा फॉर्मवर डॉक्टरांकडून रूग्णाचे नाव व पत्ता तसेच ऑपरेशनबाबत माहिती व रूग्णाचा फोटो त्यावर डॉक्टरांचा सही शिक्का घेणे अनिवार्य आहे. 
२) डॉक्टर (हॉस्पिटल) चे पक्के बील (विवरणात्मक), बील नंबरसह व ५,००० रू.चे वर असल्यास त्यावर
पावती तिकीट लावून डॉक्टरांचा सही व शिक्का घेणे अनिवार्य आहे.
३) प्रत्येक मेडीकल बीलाचे प्रीस्क्रीपशन व त्यावर डॉक्टरांचा सही व शिक्का घेणे अनिवार्य आहे.
४) ऑपरेशन संबधी सर्व तपासणी रिपोर्ट उदा: एक्स-रे, सोनोग्राफी, एम.आर.आय, सीटीस्कॅन, पॅथॉलॉजी 
वगैरे. तसेच डिस्चार्ज कार्ड घेवून त्यावर डॉक्टरांचा सही व शिक्का घेणे अनिवार्य आहे.
५) तसेच रूग्ण तपासणीकरीता योजनेच्या कार्यालयात आणने अनिवार्य आहे.
६) रूग्ण हा दारिद्ररेषेखालील असेल तर त्यांनी खालील कागदपत्रे योजनेच्या कार्यालयात आणने 
अनिवार्य आहे.


दारिद्ररेषेच्या कार्डाची प्रमाणित सत्यप्रत :

 • तलाठी यांचा भूमिहीन असल्याचा दाखला (कुटुंबप्रमुखाच्या नावाने)

 • कुटुंबप्रमुखाच्या नावाने तहसिलदार, तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.

 • कुटुंबप्रमुखाचे नावाने रहिवासी दाखले. (पोलीस पाटील, सरपंच, सचिव, तलाठी)

 • वरील सर्व कागदपत्राची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

७) रूग्ण हा जर शेती करीत असला तर त्या अर्जदारांना खालील कागदपत्रे आणने अनिवार्य आहे.

 •  शेतीचा सात बारा व आठ ‘अ‘ कुटुंबातील सर्व व्यक्तिंच्या नांवाने असलेल्या शेतीचे.

 •  कुटुंबप्रमुख यांच्या नांवाने तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला.

 •  कुटुंबप्रमुखाचे नांवाने रहिवासी दाखले. (पोलीस पाटील, सरपंच, सचिव, तलाठी)

 •  रेशनकार्डची झेरॉक्स प्रत (प्रमाणित प्रत)
  वरील सर्व कागदपत्राची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

 •  राष्ट्रीय स्वास्थ विमा योजने अंतर्गत ऑपरेशन झाले नसल्यास स्मार्ट कार्ड (R.S.B.Y.) यावर
  के ले नसल्यास असे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घेणे गरजेचे आहे.

  रूग्णांना द्यावयाच्या मदती संदर्भात प्रक्रिया :

१) योजनेचे सॉफ्टवेअर असून त्यात प्रत्येक कुटुंबाला क्रमांक देण्यात आलेले आहे. रूग्णाने अर्ज आणल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये प्रथम कुटूंब यादी तपासणे. त्यामध्ये रूग्णाचे नाव असल्यास त्याने आणलेले ऑपरेशन अर्ज तसेच संबधित सर्व रिपोर्ट मेडीकल बील, डॉक्टरांचे बील, डिस्चार्ज कार्ड इत्यादी व्यवस्थित लावून त्यावर फॅमिली आयडी. नंबर लिहून घेणे. 
२) रूग्णाच्या संपूर्ण अर्जाची पूर्तता झाल्यानंतर शेतीविषयी तसेच रूग्ण जर भूमिहीन असल्यास आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यास त्या संदर्भात असलेले सर्व कागदपत्र जसे सात बारा, आठ ‘अ‘, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्ररेषेखालील कार्डाची प्रमाणित प्रत, रेशनकार्डाची प्रमाणित प्रत इत्यादी सर्व कागदपत्रे घेवून पुढील पुर्ततेसाठी देणे.
३) रूग्णाला तपासणीसाठी फॉर्म देवून ऑपरेशनच्या तपासणीसाठी श्री संस्थानचे डॉक्टरांजवळून तपासणी करून अर्जावर रितसर सही घेणे.
४) अर्ज पूर्ण झाल्यावर त्या अर्जाची नोंद रजिष्टरमध्ये घेवून रूग्णाला प्रवास भाडे व महाप्रसाद पास देणे.
५) कार्यालयामध्ये आलेल्या अर्जासंबधित मेडीकलदृष्ट्या तो अर्ज सर्व कागदपत्रानिशी तपासून ऑपरेशनास अनूसरून योग्य आहे की नाही हे ठरविणे. अर्जाचे व्हेरीफीकेशन करणे व सॉफ्टवेअरवर अर्ज व्हेरीफाईड करून चौकशीकरिता पाठविणे.
६) प्रत्येक तालुक्यामधील गावामध्ये जावून रूग्णांची आर्थिक स्वरूपाची तसेच स्वत: व कुटुंबाविषयीची सविस्तर माहिती लिहून त्यावर कुटुंबातील व्यक्तीची स्वाक्षरी घेणे.
७) चौकशी रजिस्टर संबधी वरिष्ठांकडून तपासणी अहवाल घेणे.
८) मंजूर झालेले अर्जाची यादी तयार करून उपलब्ध निधीनूसार मंजूरात घेवून त्या रूग्णाचे डी.डी. तयार करणे. कुटुंबप्रमुखाचे नावाने डी.डी. लवकर पोहचण्याची दखल घेणे.

रूग्णांची चौकशी : यामध्ये सर्वप्रथम तालुक्यानूसार यादी तयार करून चौकशीकरिता संबधित सेवाधारी सेवकांस पाठविणे. याकरीता नेमू दिलेले सेवक पाठवून रूग्णांविषयी सविस्तर माहिती घेणे. गांवातील पाच लोकांना विचारणा करून तसेच स्वत: त्याच्या कुटुंबातील रूग्णाची विचारणा करून माहिती नोंद रजिस्टरमध्ये घेणे. रूग्ण योजनेमध्ये बसतो की नाही हे पाहून मदत मंजूर करणे. चौकशी ही तीन टप्यात केली जाते.

१) दि. १० (प्रत्येक महिन्याच्या) साठी समाविष्ट तालुके पुढीलप्रमाणे : शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपूर, खामगांव
२) दि. २० (प्रत्येक महिन्याच्या) साठी समाविष्ट तालुके पुढीलप्रमाणे : मलकापूर, बुलडाणा, मोताळा, नांदुरा
३) दि. ३० (प्रत्येक महिन्याच्या) साठी समाविष्ट तालुके पुढीलप्रमाणे : चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांवराजा

याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याची योजने अंतर्गत असलेल्या गांवातील रूग्णांची चौकशी करण्यात येते. 

आतापर्यंतचा अहवाल : श्री गजानन महाराज संस्थान शेगांव व्दारा संचालीत ग्रामिण आरोग्य सेवा योजने अंतर्गत ऑपरेशनकरीता बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ११३९ खेडेगावांतील २,४५,२६२ कुटूंबातील १२ लाखाहून अधिक गरजू व शेतकरी बांधव या योजनेचे लाभार्थी आहेत. मार्च २०१ पर्यंत ५०,७३३  गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे,या पैकी ३६,११५ रुग्णांचे विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यात आले.