संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यामध्ये खालील सेवाकार्य अंतर्भुत आहे.

वारकरी शिक्षण संस्था

संस्थानातील धार्मिक कार्यक्रम/पालखी सोहळा

भजनी साहित्य वितरण

वारकरी प्रशिक्षण शिबीर

धार्मिक व आध्यात्मिक शिबीरे

श्रींचा पालखी सोहळा

संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण. संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात.

 

   

श्रींच्या पालखीचा प्रवास :-

श्रींच्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत ७५० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगांव पर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे. 

श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना खालील तीर्थक्षेत्रावरून जाते. 
श्री क्षेत्र नागझरी- श्री क्षेत्र डव्हा-श्री क्षेत्र शिरपूर जैन- श्री क्षेत्र नरसी नामदेव-श्री क्षेत्र औंढा नागनाथ-श्री क्षेत्र त्रीधारा- श्री क्षेत्र गंगाखेड- श्री क्षेत्र परळी वैजनाथ- श्री क्षेत्र अंबाजोगाई- श्री क्षेत्र तेर-श्री क्षेत्र तुळजापूर-श्री क्षेत्र सोलापूर- श्री क्षेत्र माचनुर- श्री क्षेत्र मंगळवेढा- श्री क्षेत्र पंढरपूर.

श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग :-

श्री क्षेत्र अरण मार्गे कुर्मदास- श्री क्षेत्र बार्शी (भगवान) - श्री क्षेत्र कुंथलगिरी- श्री क्षेत्र कपीलधारा- शहागड-जालना-न्हावा-सिंदखेड राजा-लोणार-मेहकर-खामगांव-शेगांव.

स्वागत :-

श्रींचे पालखीचे स्वागताकरिता गावांतील भजनी मंडळी, बँड पथक, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह येतात. मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. तसेच पुष्प वर्षाव केल्या जातो.
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच श्रींच्या पालखीचे गावांतील नागरीकांकडून श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.

प्रवासात असणाया सोई :- 

श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगलकार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरिता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परिने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात. 

वाटेत भेटणाया वारकरी दिंड्यांची सेवा :-

श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी इतरही भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाया दिंड्यातील पुरुष-महिला, मुले-मुली इत्यादी वारकयांना संस्थानकडून कपडे वितरित करण्यात येतात. तसेच प्रत्येक दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात येतो.
पंढरीच्या मार्गावर भेटणाया दिंडीतील वारकरी मंडळीना आवश्यकतेनुसार औषध-इंजेक्शन सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याच प्रमाणे पिण्याच्या पाण्याकरिता टँकरची व्यवस्था केलेली असते.