उत्सव

श्री प्रगटदिनोत्सव  श्रीराम जन्मोत्सव  श्री पुण्यतिथी उत्सव (श्री ऋषीपंचमी)  वर्षभरातील विविध उत्सव


श्री पुण्यतिथी :- 

शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास। भाद्रपद शुद्ध पंचमीस। गुरुवारी प्रहर दिवसाला ।।३१३।।
प्राण रोधीता शब्द केला । जय गजानन ऐसा भला। सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवा माझारीं ।।३१४।।
                                                        --- अध्याय १९ वा.

भाद्रपद शु. पंचमी, श्री ऋषीपंचमी शके १८३२, अर्थात ८ सप्टेंबर १९१० या दिवशी श्रींनी संजीवन समाधी ग्रहण केली. हा दिवस श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाप्रसंगी भाद्रपद शु. १ ते ५ श्रींच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये श्री गणेशयाग व वरुणयागाचे आयोजन करण्यात येते. 

या उत्सवांप्रसंगी प्रचंड यात्रेचे आयोजन होत असते. प्रत्येक उत्सवात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या भजनी दिंडयांचा सक्रिय सहभाग असतो. श्रींच्या मंदिरावर व परिसरात या निमित्त विद्युतदिपांची रोशणाई करण्यात येते. श्रींची पालखी गज, अश्व, रथ, मेणा, दिंडी आदी वैभवासह पूर्ण गावात नगरपरिक्रमेकरिता मिरवणूक निघते. टाळ मृदंगाच्या निनादात हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तिभावाने दुमदुमून जाते. येथे यात्रा उत्सवात येणा-या भजनी दिंडीस १० टाळजोड, १ मृदंग व १ वीणा हे भजनी साहित्य नियमाची पूर्तता केल्यानंतर वितरीत करण्यात येते तसेच श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज अभंग गाथा व श्री एकनाथी भागवत हे संत वाङ्मय देखील विनामूल्य देण्यात येते.