संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

संस्थानचे सामाजिक क्षेत्रातील कार्य

समाजात अनेक मूलभूत समस्या आहेत. या समस्यांतून निरलसपणे, निःस्पृहपणे मार्ग काढीत समाजजीवन अधिक सुदृढ व्हावे त्यासोबतच समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांना जगरहाटीत सन्मानाने जगता यावे यासाठी श्री गजानन महाराज संस्थान व्दारा अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध समस्यांचा साकल्याने विचार करून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या अनेकविध प्रकल्पांव्दारे समाजातील दुर्बल व उपेक्षित घटक कसा सक्षम होईल याविषयीचा संस्थानचा ध्यास व कळकळ दिसून येते.

लोकोपयोगी सेवाकार्य :-

१) भक्तांना हिवाळ्यात गरम पाण्याची विनामूल्य व्यवस्था देखील करण्यात येते. साफसफाई विभाग हा मंदिरातील परिसर साफ ठेवण्याचे काम करतो. भक्तांची वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी सेवार्थ पार्कींग विभाग व भक्तांच्या सुविधेसाठी विनामूल्य सेवार्थ पादत्राणे विभाग आहे. 
२) संस्थानचे वाचनालय १९७५ सालापासून सुरू करण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्या, बालवाङ्मय इत्यादी जवळजवळ ६५०० पुस्तकांचा संग्रह या वाचनालयामध्ये आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू या भाषांमधील २५ दैनिके वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत.
३) दिवाळी सणानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व सातपूडा परिसरातील आदिवासी बांधवांसाठी प्रतिवर्षी नविन कपड्यांचे व मिष्टांन्नांचे वाटप त्यांच्या भागात जावून करण्यात येते.
४) संस्थानतर्फे अवर्षणग्रस्त भागातील गुराढोरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते.
५) संस्थानच्या वॉटरसप्लाय परिसरात २ एकर परिक्षेत्रात स्वतंत्र रोप वाटिका असून आनंदसागर व इतरत्र लागणारी रोपे येथे तयार करण्यात येतात. त्यामधे प्रामुख्याने कडुनिंब, सिसम, सिरस, पिंपळ, करंज, औदुंबर, बुच यासारखी दाट सावलीची वृक्ष इत्यादींचा समावेश आहे. आजपर्यंत संस्थानने १ लक्ष वृक्षांचे रोपण व संवर्धन केलेले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपना करिता सेवाभावी संस्थांना त्यांच्या उद्देशाची पडताळणी करून रोपे विनामूल्य पुरवल्या जातात.
७) ट्रॅक्टरवरच फायरब्रिगेड मशीन बसवलेली असून आगजनी प्रसंगी तत्परतेने फायरब्रिगेड सेवा पुरवली जाते.