मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे 

<< मागे    
 

श्री गजानन महाराजांचे विश्रांती स्थळ

श्री गजानन महाराज समाधी मंदिराच्या मागील बाजूस ‘श्रीं‘चे विश्रांती स्थळ आहे. येथे ‘श्रीं‘च्या नित्य बैठकीतील पलंग तसेच ‘श्रीं‘च्या पादुका दर्शनार्थ ठेवल्या आहेत. येथेच समोर असलेल्या भव्य पारायण मंडपामध्ये शेकडो भाविक तन्मयतेने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असल्याचे दृश्य दिसून येते.

   

श्रींचे समाधी ग्रहण स्थळ

श्रींच्या विश्रांती स्थळाचे बाजूलाचं ‘श्रीं‘चे देहविसर्जन स्थळ आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी, शके १८३२, दि. ०८/०९/१९१० रोजी ‘श्रीं‘नी जिथे संजीवन समाधी ग्रहण केली, त्याच ठिकाणी ‘श्रीं‘चे संगमरवरी समाधी ग्रहण स्थळ आहे. मागील बाजूस विठोबा-रखुमाईची मूर्ती असून जवळच ‘श्रीं‘नी त्याकाळी प्रज्वलित केलेली व आजही जागृत असलेली धुनी तसेच ‘श्रीं‘नी हाताळलेले चिमटेही भक्तजनांना पाहावयास मिळतात.

   

पारायण मंडप:-

मंदिरात येणाऱ्या भाविकांना संतकवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करता यावे यासाठी मंदिरातच महाराजांच्या विश्रांतीस्थळाच्या समोरच भव्य पारायण मंडप आहे. शेकडो पारायणार्थी भक्त इथं ऐसपैसपणे बसू शकतात. पांढऱ्या शुभ्र मार्बलवर हिरव्या मऊसूत पथाऱ्या अंथरलेल्या, त्यावर शांतचित्ताने पारायणाचा आनंद घेता यावा यासाठी लाकडाची तक्तपोशी, ग्रंथ ठेवण्यासाठी, तबक ठेवण्यासाठी लाकडी फळीचा बेंच, निरंजनासाठी काच व अगरबत्ती स्टँड, उपलब्ध करून दिलेल्या लहान-मोठ्या अक्षरातल्या पोथ्या इतकंच काय तर एखादा भक्त पारायणाची प्रबळ इच्छा धरून आला असेल आणि नेमका आपला चष्मा विसरला असेल तर त्याने काळजी करण्याची आवश्यकता नाही. इथे विविध नंबर्सचे चष्मेसुद्धा ठेवले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचण्यास सुलभ अशा मोठ्या अक्षरातील ग्रंथाची व्यवस्था केलेली आहे. सेवेकऱ्यांच्या मदतीने आपल्या वाचनदृष्टीचा चष्मा शोधून पारायणापुरता वापरता येतो. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते.