श्रींचे समाधि मंदिर

श्री मंदिर परिसर व इतर दर्शनीय स्थळे

"श्री" गजानन महाराजांचे समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या ‘ उत्तर व पश्चिम ' दिशेस दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत.

      अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष "श्री" नी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना '' या जागी राहील रे '' असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर आज "श्री" चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. "श्री" च्या समक्ष व संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या भुयारात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे "श्री" ची संजीवन काया "समाधिस्थ" आहे.


पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे !

     संतांजवळ सर्व जातीपंथाचे भक्त अमन शांती मिळावी म्हणून जातात. गुरू हे तत्व आहे, पवित्र जीवन ते संत. श्रध्दा व भावाची दृढता ते भक्त. "श्रीं" चे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले असून थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून‘ दर्शन घेता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस नानाविध देवीदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत.

  ध्वज :-

श्रीराम मंदिर


"श्रीं" चे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे; संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराचे प्रवेशव्दार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहेत. हे चांदीचे मुखवटे श्रींच्या पालखी सोहळयामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.

सभामंडप :

श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन, पायऱ्या चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते.