वारकरी व्यवस्था

श्री गजानन महाराजसंस्थान व्दारे प्रामुख्याने श्री प्रगटदिन, श्रीरामनवमी, श्री पुण्यतिथी हे तीन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या उत्सवांमध्ये सहभागी होण्याकरिता लाखो वारकरी आपल्या दिंड्या घेवून येत असतात. अशाप्रकारे आलेल्या वारकऱ्यांची संस्थेमार्फत आवश्यक प्राथमिक सुविधायुक्त व्यवस्था करण्यात येते.

 

१) निवास व्यवस्था (मंडप) :-

वारकरी यांचे संख्येनुसार विसावा व विहार परिसर या दोन ठिकाणी मंडप देण्यात येतात. तसेच श्री पुण्यतिथी उत्सवामध्ये वॉटरप्रुफ मंडप देण्यात येतात. वारकरी संख्या ही दरवर्षी प्रत्येक उत्सवामध्ये मागील वर्षापेक्षा २५ ते ३० टक्के वाढीव असते. वारकरी संख्येच्या आकडेवारीनुसार मंडप देण्यात येतात. मंडपामध्ये जाणे-येणेकरिता रस्ते ठेवण्यात येतात. प्रत्येक मंडपामध्ये साफसफाईकरीता एक सेवाधारी गट असतो त्यावर देखरेखीकरिता एक देखरेख सेवक असतो. मंडपामध्ये वारकरींना जाणेयेणेकरिता मंडपाचे चारही बाजूंच्या सर्व रस्त्यावर मंडप क्रमांक व गेट क्रमांकाचे फलक वारकऱ्यांच्या माहीतीकरीता लावण्यात येतात. तसेच मंडपमाध्ये ओले कपडे सुकविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडपामध्ये अग्निशामक सिलेंडर लावण्यात येतात. तसेच वारकऱ्यांना सूचना व माहिती देण्याकरीता स्पीकरची व्यवस्था करण्यात येते. मंडपामध्ये ट्यूबलाईट व मंडपाच्या चारही बाजूने प्रकाशाची व्यवस्था करण्यात येते. 

 

२) श्री महाप्रसाद व्यवस्था :-

उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी दिंड्याची विनामूल्य भोजन व्यवस्था ही अहोरात्र २४ तास चालू असते. त्यामुळे वारकरी हे रात्रनदिवस कोणत्याही वेळेला आले तरी त्यांची भोजनाची व्यवस्था होते. याकरीता महाप्रसादबारी, प्रसाद वितरण व भोजन मंडपाची व्यवस्था करण्यात येते. साफसफाई करिता सेवाधारी गटांचे नियोजन करण्यात येते. महाप्रसाद वितरणावेळी एकाचवेळेस दहा लाईन चालतील अशी व्यवस्था करण्यात येते. मंडपामध्ये प्रकाशाची व्यवस्था करण्यात येते. 

 

३) चौकशी कक्ष :-

सर्वसाधारणपणे उत्सवामध्ये येणाऱ्या दिंडयामधील वारकरी हे ग्रामीण भागातून येणारे असतात. याकरिता वारकऱ्यांच्या माहितीकरीता २ ते ३ ठिकाणी चौकशी कक्षाची व्यवस्था करण्यात येते. चौकशी कक्षामध्ये वारकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतात. दोन अनुभवी नियमीत असणारे सेवाधारींची नियुक्ती करण्यात येते.

 

४) प्रथमोपचार केंद्र :-

उत्सवामध्ये वारकऱ्यांकरिता दोन्ही परिसरामध्ये रात्रंदिवस प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येते. दवाखान्याकरिता मंडपामध्ये पार्टीशन लावून त्यामध्ये टेबल, खुच्या, कुलर, रुग्णाकरिता कॉट, सलाईन स्टँड, पंखे, पिण्याचे पाणी तसेच प्रतिक्षालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात येते. दिवसाला पाच व रात्रीला तीन डॉक्टर्स याप्रमाणे दोन्ही परिसरामध्ये सोळा डॉक्टर्स, इंजेक्टर, कंपाऊंडर, ड्रेसर, रुग्ण नोंदणी, औषध वितरण व त्यावर देखरेखीकरिता सेवकांची सुद्धा नेमणूक करण्यात येते. प्रथमोपचार केंद्राच्या बाजुलाच २४ तास अ‍ॅम्बुलन्स सज्ज असते.

 

५) स्नानगृह व्यवस्था :-

उत्सवामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्नानाच्या व्यवस्थेकरिता आनंदविहार व  विसावा या दोन्ही परिसरामध्ये १००० नळ तोटींची क्षमता असलेले भव्य स्नानगृह तयार करण्यात आलेले आहे.

   

६) पार्किंग व्यवस्था :- 

यात्रा उत्सवासमध्ये बहुतांश वारकरी लांबून येत असल्यामुळे ते त्यांच्या वाहनाव्दारे येतात. त्याकरिता त्यांची वाहने व्यवस्थित ठेवण्याकरिता संस्थेमार्फत पार्कींगची व्यवस्था करण्यात येते. मंडपामागील मोकळ्या जागेमध्ये चुन्याने आखणी करून वारकऱ्यांची वाहने व्यवस्थित लाईनमध्ये लावण्यात येतात.

 

 

इतर व्यवस्था :-

१) पिण्याचे पाणी व्यवस्था:-

उत्सवामध्ये आलेल्या मोठ्या प्रमाणातील वारकऱ्यांसाठी पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते. दिंडी नोंदणी कार्यालयासमोर, पार्किंगमध्ये, भोजनमंडपासमोर, दवाखाण्यामध्ये, अंशदान मंडपासमोर तसेच मंडपाच्या संख्येनुसार प्रत्येक मंडपाजवळ पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था करण्यात येते. पिण्याचे पाणी हे निर्जंतुकीकरण करून (क्लोरीन टाकून) वारकरी भक्तांना देण्यात येते. पिण्याच्या पाण्याची २४ तास व्यवस्था करण्यात आलेली असते.

 

२) प्रसाधन व्यवस्था :-

वारकरी भक्तांच्या सोईकरिता निवास मंडपाच्या जवळपासच नैसर्गिकविधींकरिता महिला व पुरुषांकरिता वेगवेगळ्या प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात येते. तसेच आरोग्यविषयक सुविधेकडे विशेष लक्ष पुरविण्यात येते.

 

३) विद्युत व्यवस्था

निवास व्यवस्थेचे व इतर मंडप तयार झाल्यानंतर विद्युत विभागामार्फत प्रत्येक मंडपामध्ये लाईट, फोकस, स्पिकर लावण्यात येतात. हे सर्व करीत असताना काही अपाय होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेतली जाते. लाईट गेल्यास अतिरिक्त जनरेटरची सुद्धा व्यवस्था केलेली असते. प्रत्येक मंडपाच्या गेटवर खबरदारीचा उपाय म्हणून फायर सिलेंडर सुद्धा लावण्यात येतात. देखरेख करण्याकरिता स्वतंत्र देखरेख सेवकांची नियुक्ती करण्यात येते.

 

  ) कीर्तन व्यवस्था :-

उत्सवामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना उत्सवाच्या दिवशी कीर्तन श्रवणाचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून विसावा किंवा विहार यापैकी एका परिसरामध्ये कीर्तनाची व्यवस्था करण्यात येते. कीर्तनाकरिता नैतिक शिक्षण विभागामार्फत निमंत्रीत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन ठेवण्यात येते. कीर्तनाची व्यवस्था वारकरी भोजन मंडपामध्ये करण्यात येते. कीर्तनाची वेळ रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ठेवण्यात येते.