अध्याय पहिला
अन्न भक्षिले देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनी । अवश्य पाहिजे जाणिला ।।१३०।।
अध्याय दुसरा
हें नाणें तुमचें व्यवहारी । मला न त्याची जरुरी ।
भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ।।५०।।
जें जें जयानें सांगावे । तें तें त्यानें आचरावें।
शब्दच्छलासीं न करावें । साधकाने केव्हांही ।।६५।।
अध्याय चौथा
जा वेळ करूं नको। उगीच सबबी सांगू नको । गुरुपाशीं बोलू नको। खोटे वेड्या यत्किंचित् ।।८३।।
अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरून । त्या कर्माची तुजलागून । फळें भोगणें भाग असे ।।११७।।
ती फळें भोगल्याविना। सुटका तुझी होईना । दे हा टाकून हट्टीपणा । विवेक
कांहीं करी मनी।।११८।।
असो एक्या समयीं भली ।
समर्थांसी इच्छा झाली । ती त्यांनी निवेदिली ।। आपल्या शिष्यवर्गातें ।।१४३।।
वैदिक ब्राम्हण बोलवा । मंत्र जागर येथें करवा । वेदश्रवणे देवदेवा ।। आनंद होतो अतिशय ।।१४४।।
अध्याय ५ वा
पुण्य पाणी
पाजण्याचें । आहे बापा थोर
साचें। पाण्यावाचून प्राणाचे । रक्षण होणे
अशक्य ।।९७।।
अध्याय ६ वा
संतत्व नाहीं मठांत। संतत्व नाही विद्वत्तेत। संतत्व नाही कवित्वांत ।
तेथें स्वानुभव पाहिजे ।।८४।।
कर्म मार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ।।११९।।
आचरून कर्म
फल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या
अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही।।१२०।।
अध्याय ७ वा
पहिली संपत्ति शरीर । दुसरें तें घरदार । तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ।।५७।।
अध्याय ८ वा
ज्यांनी राख लावावी । त्यांनी उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ।।१४७।।
नुसते शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात । तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ।।१४८।।
अध्याय ९ वा
ब्राह्मणाचें भाषण । कदा नसावे अप्रमाण । या
तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ।।७३।।
व्दिजे निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला ।
ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकलें सांप्रत।।७४।।
बोलण्यात पाहिजे मेळ । चित्त असावे निर्मळ। तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ।।७६।।
अध्याय १० वा
महाराज वदले अखेर। गणेश आप्पाचा धरून कर ।
तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ।।२९।।
तुझ्या सदनीं
वाटतें यावें । कांही वेळ बसावें । अरे चित्ती असेल ते बोलावे । भीड न धरितां कवणाची।।३०।।
अध्याय ११ वा
गजाननांचे समोर। आणिला पाटील भास्कर।बाळाभाऊनें समाचार ।अवघा समर्थांसी श्रुत केला।।२०।।
तो अवघा ऐकून । महाराज वदले हसून । हत्या, वैर आणि ऋण । हे कोणासी चुकेना।।२१।।
महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझे अज्ञान । अरे
वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ।।३५।।
जन्मे न कोणी, मरे न कोणी । हे जाणावया लागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ।।३६।।
संचित - प्रारब्ध
- क्रियमाण । हें भोगल्यावाचून । या बध्द जीवा लागून । सुटका होणें मुळींच नसे।।३८।।
पूर्वजन्मीं जे करावें । तें या जन्मी भोगावे
। आणि ते भोगण्यासाठीं यावें। जन्मा हा
सिद्धान्त असे ।।३९।।
अध्याय १२ वा
राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ।।१४०।।
अध्याय १३ वा
एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी । तो गाडीवान झाला दुरी । महार होता म्हणून ।।३५।।
तयीं महाराज वदले तयास । कां रे
खालीं उतरलास ? । आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ।।३६।।
अध्याय १४ वा
अरे आत्महत्या
करु नये। हताश कदापि
होऊं नये। प्रयत्न करण्या
चुकूं नये। साध्य
वस्तु साधण्यास।।३८।।
आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ।।३९।।
नको जावुं हिमालया ।
गंगेमाजीं प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेडया करूं नको ।।४०।।
आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेपण । त्यांत नसे सार
कांहीं ।।५७।।
जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ति । तो न उपेक्षी कदा तुला ।।५८।।
अध्याय १५ वा
सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो
मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल।।८७।।
जेंव्हां स्वार्थाचा संबंध नसतो ।
तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा
सिद्धांत तो। होईल खोटा कोठूनी ।।९४।।
अगणित करावें पुण्य । तेंव्हाच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ।।१३०।।
ते योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला
। योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ।।१३१।।
अध्याय १६ वा
मग ते एकमेकांचे । काय गुरू होती साचे । नादी
दंभाचाराचें । त्वां पुंडलीका
पडूं नये ।।२७।।
अध्याय १७ वा
फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललो
कांहींतरी ।।१९।।
दोरीसी दिधल्या फार ताण । मी मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून
। तूं या फंदात पडूं नको ।।२०।।
अध्याय १८ वा
लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करिती ।। संत अथवा देव हो ।।१६५।।
अध्याय १९ वा
मलीनता मनाठायीं । अंशेही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ।।९१।।
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगे असती जाण । या भक्तिमार्गाला ।।९३।।
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक । शरीरभेद व्यावहारिक ।
त्याचें कौतुक कांहीं
नसे ।।१०४।।
ज्याची निष्ठा बसेल । वा ! जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरूर मला ।।१२७।।
मी गेलों
ऐसें मानूं नका । भक्तीत अंतर करूं नका । कदा मजलागी विसरूं नका । मी आहे येथेंच ।।३११।।
अध्याय २० वा
यामध्यें न कांही सार । धन भूचें भूमिवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ।।२५।।
अभिषेक ब्राम्हण भोजन । हे पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं
वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ।।२६।।
निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ।।१७८।।
अध्याय २१ वा
व्देषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुध्द जावुं नये । उगीच भलत्या कामांत ।।६६।।
साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापिही लागूं नये ।।६७।।
आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुखे त्याला लावू नये ।।६९।।
अपमान खऱ्या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संत चरणीं प्रेमा धरीं ।।७०।।
सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु ना माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ।।२१४।।
|