श्री संस्थेची अधिकृत शाखा 

श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी
श्री क्षेत्र ओंकारेश्वर श्री क्षेत्र गिरडा श्री क्षेत्र पंपासरोवर (कपिलधारा क्षेत्र),नाशिक
 

 ...............................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र पंपासरोवर (कपिलधारा क्षेत्र),नाशिक

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखेपासून ४० कि.मी. अंतरावर घनदाट वनराईत असलेले श्री क्षेत्र पंपासरोवर. याच ठिकाणी श्री गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती. तेथेच निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या झऱ्याला बाराही महिने मधुर पाणी असते. पूर्वी या परिसरातील वनवासी झऱ्याचे पाणी कसेही वापरून खराब करत असत. आता मंदिराने हे पाणी एका टाकीत साठवून, त्याचे शुध्दीकरण करून नळाव्दारे येथील वनवासींना उपलब्ध करून दिले आहे. झऱ्याचे उगम असलेल्या जागी गोमुख तयार करून या कुंडाची रोजच्या रोज सफाई सेवाधाऱ्यांकडून केली जाते.

श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे सर्वप्रथम कुंभमेळा भरत होता, आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो. या तीर्थावर स्नान केले असता गंगासागर तिर्थाचे पुण्य प्राप्त होते. या तीर्थावर सत्ययुगामध्ये भगवान कपिल यांनी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून स्वर्गस्थ केले. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो असे सांगितले जाते.

श्री कपिलधारा तीर्थक्षेत्र येथेच श्रीराम व श्रीशंकराची भेट झाली. या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहे. राम-रावण युध्दादरम्यान लक्ष्मणावर शक्तीप्रहार झाला असता तो शुध्दीवर यावा यासाठी श्रीहनुमान संजीवनी बुटी आणण्यास या तीर्थावरून जात होते, तेव्हा त्यांना अडवणाऱ्या कात्यनेमी राक्षसाचा त्यांनी येथे वध केला त्यामुळे या गावाचे नांव कावनई असे रूढ झाले. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणाचे मृत मुल जल पाजून जिवंत केले. तसेच या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना ‘सनातन धर्माच्या रक्षणार्थ तुमचा जन्म झाला असल्याने तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिराची स्थापना करा.‘ असा उपदेश केला. तसेच कावनई गावच्या एका ब्राह्मणाला तीर्थकुंडातील तीर्थ देऊन कुष्ठरोग बरे केले व अनेक चमत्कारही केले.

या ठिकाणी श्रींनी १२ वर्षे तपश्चर्या केली होती. त्यामुळे पवित्र असलेल्या या क्षेत्री संस्थानने आठ एकर जमीनीवर ही शाखा कार्यान्वित केली आहे. या जागी श्रींचे भव्य संगमरवरी मंदिर, महाव्दार, सेवकनिवास, साधना कुटी, प्रवचन हॉल उभारण्यात आला  आहे. संस्थानने हे क्षेत्र साधना स्थळ म्हणुन घोषित केले आहे. हा भाग आदिवासी पट्टयातला असून संस्थानने समाजकार्यातीत उपक्रम म्हणून आदिवासी - बांधवांसाठी  फिरते रूग्णालय सुरू करून विनामुल्य औषधोपचार करण्यात येतो तसेच प्रतिवर्षी ४०,००० आदिवासी बांधवांना कपडे व मिष्ठान्नासह महाप्रसाद वितरण होऊन सेवा घडून येत आहे. 

अशा प्रकारे श्रींच्या अनुग्रहामुळे संस्थानच्या सर्व प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्याची संस्थानची धडपड आहे. श्री गजानन महाराजांच्या कृपादृष्टीनेच हे प्रकल्प लवकरात लवकर श्री चरणी रुजू करण्यासाठी व्यवस्थापक मंडळ कटिबध्द झाले आहे. भाविक भक्तांच्या सहकार्यावर संस्थानचा दृढ विश्वास असल्यामुळे हे सर्व प्रकल्प पुर्णत्वास जातील, अशी संस्थानची खात्री आहे. सत्य संकल्पांचा दाता, शेगांवीचा राणा या सर्व प्रकल्पांना पुर्णत्वास नेवो हीच श्री चरणी प्रार्थना आहे.