श्री संस्थानची पहिली शाखा श्री क्षेत्रपंढरपूर येथे असून तेथील साडेआठ एकर पुण्यभूमित श्रींचे संगमरवरी मंदिराचे निर्माण झाले असून या भव्य मंदिरात श्रींच्या
मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्याच प्रमाणे ७२ फुट उंच व ५१ फुट रूंद धोलपूरी दगडाचे अत्यंत कलाकुसरयुक्त महाव्दाराचे काम पुर्ण झाले आहे व इतर सेवा कार्यान्वित झाल्या आहेत. या शाखेत २५२ खोल्यांचे वेगवेगळया पध्दतीचे ५ भक्तनिवास बांधून पूर्ण झाले आहेत. या भक्तनिवासात शेकडो भाविकांची निवासाची व्यवस्था होते, भक्तांना या भक्तनिवासातील खोल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे मिळू शकतात. संस्थानच्या या शाखेत अद्यावत होमिओपॅथी, वारकरी शिक्षण संस्था, संगीत विद्यालय तसेच सार्वजनिक कार्याकरिता दोन सभागृहांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. संस्थेतर्फे होमिओपॅथी औषधालय सुरू केले आहे. आषाढी, कार्तिकीवारीला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी संस्थानाचे फिरते रूग्णालय आठ दिवस येथे कार्यरत असते. प्रतिवर्षी अंदाजे २० ते २५ हजार वारकरी सेवेचा लाभ घेतात.
या व्यतिरिक्त संस्थानने १८ एकर जमीन पंढरपूर येथे घेवून ठेवली असून श्रींचे जसे मार्गदर्शन होईल त्यानुसार तेथे काही प्रकल्प सुरू करण्यात येतील.
आषाढी व कार्तिक वारीचे वेळेस तीन दिवस अंदाजे तीन ते चार लाख भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येतो. येथील प्रसादालयांत सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळते. एकादशीला साबुदाणा खिचडी, भगर, आमटी व केळी असे उपवासाचे पदार्थ असतात. रात्री अपरात्री येणाऱ्या भक्तांना रात्री दहा ते एक वाजेपर्यंत मसालेभात आणि कढी यांचे विनामूल्य वितरण करुन भोजन व्यवस्था करण्यांत येते. चातुर्मासात वारकरी परंपरेनुसार चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदींचे आयोजन केले जाते. चातुर्मासांत ५०० लोकांना दररोज माधुकरी दिली जाते.
भजनी साहित्य वितरण :-
या व्यतिरिक्त आषाढी-कार्तिकी एकादशी वारीचे वेळेस विविध प्रांतातून येणा-या ग्रामीण भजनी दिंडयांना भजनी साहित्य वितरित करण्यात येते.
आतापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे
२२२२ ( गावांना ) भजनी साहित्य वितरीत करण्यात आले आहे.
सदरहू भजनी दिंडया - नागपूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई, पूणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, ( महाराष्ट्र ) निजामाबाद, बागलकोट, बेळगांव, विजापूर, गदग, कोप्पल, सुमोगा, डावणगिरी, हवेरी, धारवाड, चिकमंगरुळ, कारवार, बिल्लारी, तुमकर, ओव्हर, बिदर (कर्नाटक) बुरहाणपूर ( मध्यप्रदेश ), आदिलाबाद ( आंध्रप्रदेश ),
पणजी (गोवा) जिल्ह्यामधून आल्यात.
वरील सर्व दिंडयांना १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी, १ ज्ञानेश्वरी, १ तुकाराम महाराज गाथा, १ एकनाथी भागवत ( संतवाड:मय ) अशा साहित्याचे वितरण करण्यात आले.
आषाढ शु. १० किंवा कार्तिक शु. १० ला सदर दिंडयांची भजनी साहित्य नियमाची पुर्तता कागदपत्राची संगणकीय तपासणी करून एकादशीला भजनी साहित्य वितरणाची वेळ दिली जाते. त्या वेळात त्यांना भजनी साहित्याचे वितरण करण्यात येते.
मंदिरात तिन्ही वेळची पूजा व आरती करून नैवद्य अर्पण करण्यात येतो. श्रीरामनवमीला लाडूप्रसाद, ऋषिपंचमीला बुंदीवाटप आणि प्रगटदिनाला केसरीभात यांचे वितरण केले जाते. या उत्सवाच्या कालावधीत १० ते १५ हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आषाढी आणि कार्तिकी वारीला सुमारे ४ ते ५ लाख वारकरी भक्त मंदिरात दर्शन व कार्यक्रमास येतात, शिवाय शेगांवहून येणाऱ्या वारीमधील वारकऱ्यांची व्यवस्थाही येथेच केली जाते. आषाढीचे व कार्तिक वारीचे वेळस सहा दिवस महाप्रसादाचे वितरण केले जाते.